मुंबई आगामी विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी माजी खासदार किरीट सोमय्यांना दिली. पण त्यांनी ती जबाबदारी नाकारली आहे. निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंना पत्र लिहून त्यांनी आपण पद नाकारत असल्याचं म्हटलं आहे. सोमय्यांनी पत्र लिहून त्यातून त्यांचा संताप व्यक्त केला. त्यानंतर आता पदाचं शेपूट कशासाठी, असा सवाल त्यांनी थेट पक्षालाच विचारला आहे.
मी पक्षासाठी काम करतोय, सक्रिय आहे, याची जाणीव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना आहे. मला पदाची गरज, लालसा नाही. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी मला तिथून निघून जाण्याची सूचना केली. मी निघून गेलो, अशी कटू आठवण सोमय्यांनी सांगितली.
फडणवीसांनी मला निघून जाण्यास सांगितलं. मी तिथून निघूनदेखील गेलो. पण तेव्हापासून आजपर्यंत साडे पाच वर्ष मी पक्षासाठी काम करत आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या कामात कुठेही खंड पडलेला नाही. मग मला कशाला कोणत्या समितीचं सदस्यत्व देता? कमिटीच्या शेपटाची गरज काय?, असे सवाल सोमय्यांनी विचारले. कार्यकर्ता म्हणून मी दुप्पट काम करतोय, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली.
सोमय्यांनी रावसाहेब दानवेंना पत्र लिहून त्यांची भूमिका मांडली आहे. या पत्रातून सोमय्यांनी संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे. ‘आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे. मला अमान्य आहे. यासाठी आपण अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असं सोमय्यांनी पत्रात म्हटलं आहे.
मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती. माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसं आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षानं पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो,’ असं सोमय्यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.