कोकणवासी परतीच्या वाटेवर! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून ३२४८ एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण

Khozmaster
2 Min Read

गणरायाच्या पाठोपाठ आलेल्या गौराईंचे आदरातिथ्य करून त्यांना आज, गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. गौरी-गणपती विसर्जन केल्यावर कोकणवासी मुंबईकर परतीची वाट धरतात. परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या सज्ज झाल्या असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातून ३,२४८ एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गासह अन्य महामार्गावरील खड्डे, प्रवासात कोसळणारा पाऊस यांमुळे कोकणवासीयांचा रस्ते प्रवास आदळआपट होऊनच पूर्ण झाला. रस्त्यांची वाईट अवस्था आणि त्यात काही वाहनचालकांचा बेशिस्तपणा यांमुळ मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. परतीच्या प्रवासात ही अशीच कोंडी होण्याची शक्यता असल्याने लवकरच प्रवासाला सुरुवात करण्याकडे प्रवाशांचा ओढा आहे.कोकण ते मुंबई अशा प्रवासासाठी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातून एकूण ३,२४८ विशेष गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यात समूह आरक्षणाच्या ८८२ आणि वैयक्तिक आरक्षणाच्या २,३६६ गाड्यांचा समावेश आहे. उत्सव वाहतुकीसाठी पाच हजार गाड्या महामुंबईसह राज्यातून कोकणासाठी चालवण्यात आल्या होत्या. दीड, पाच दिवसांचे विसर्जन झाल्यावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी काही प्रवाशांनी यापूर्वीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर येणाऱ्या शुक्रवार-शनिवार आणि अनंत चतुर्दशीचा मंगळवार व बुधवारी परतीच्या प्रवासासाठी मोठी मागणी प्रवाशांनी नोंदवली आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोकणातील जादा वाहतुकीसाठी मुंबईसह राज्यातून एसीगाड्यांसह चालक-वाहकांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई-कोकण असा प्रवास पूर्ण झाल्यावर शुक्रवार १३ ते बुधवार १८ सप्टेंबरपर्यंत परतीची वाहतूक सुरू राहणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी या दिवशी मुंबईत परतण्याकडे प्रवाशांचा कल असल्याचे परतीच्या आरक्षणावरून स्पष्ट होते. शुक्रवारी-शनिवारी मुंबई गाठून उर्वरित तीन दिवस मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन शहर-उपनगरातील उत्सवात सहभाग होण्याचे नियोजन कोकणवासीयांचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *