महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकी घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील आठही विभागांच्या तयारीची माहिती घेणाऱ्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकींचे आयोजन केले असून, मतदानकेंद्रांपासून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदारयाद्या याविषयीची प्रत्येक विभागाची तयारी तपासून पाहण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून सुरू झालेल्या या तयारीमुळे राज्यात निवडणुका लवकरच घोषित होणार की काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर हरियाणा, जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार, याविषयी अनेक भाकिते वर्तवण्यात येत आहेत. नोव्हेंबर महिन्यात की त्याच्या आधीच निवडणुका पार पडतील, याविषयी राजकारणीही भाष्य करताना पाहायला मिळत आहे. परंतु, निवडणुकीआधीची तयारी पाहण्यासाठी महत्त्वाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम या आढावा बैठकीला संबोधित करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबईतील निवडणूक अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी सूचना देताना, भारतीय निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणूक २०२४ची घोषणा नजिकच्या काळात होणार असून, त्याच्या तयारीसाठी ही बैठक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकांत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोकण आणि मुंबई शहर व उपनगर या प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजल्यापासून या बैठकांची मालिका सुरू होणार असून, ती दुपारपर्यंत सुरू राहील. या बैठकीत मतदानासाठी कर्मचारी वर्गाची निश्चिती, कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा, विभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी चर्चा होईल. मतदानकेंद्रांची तपासणी, मतमोजणी केंद्रांचे प्रस्ताव, मतदारयाद्यांच्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेची सद्यस्थिती, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण याविषयीही चर्चा करण्यात येणार आहे. याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, निवडणुका घेण्याआधी त्याची तयारी कितपत झाली आहे, याची माहिती घेतली जाते आणि ती माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविली जाते. ही बैठक निवडणूक जाहीर होण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.