सिव्हिल’मध्ये सलाइन, औषधांचा तुटवडा; श्वास, सर्प दंशावरील औषधांचाही साठा तोकडा

Khozmaster
2 Min Read

शहर व जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह साथरोगांनी डोके वर काढले असताना जिल्हा रुग्णालयात अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे सलाइनचाही तुटवडा जाणवत असून, रुग्णांवरील उपचार प्रक्रियेवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. याशिवाय श्वान दंश आणि सर्प दंशावरील औषधेही मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयात ५५० हून अधिक खाटा आहेत. प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक रुग्ण येथे उपचार घेत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण उपचारांसाठी याच रुग्णालयावर अवलंबून असतात. परिणामी रुग्णालयात सतत रुग्णांची वर्दळ असते. पावसाळ्यात यंदाही साथरोगांनी डोके वर काढले आहे. विशेषत: डेंग्यूने थैमान घातले आहे. मलेरियासह विविध साथरोगांचे रुग्ण सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पहावयास मिळत आहेत. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांचा ओघ वाढला असताना खरेतर त्या प्रमाणात औषधांची उपलब्धताही वाढायला हवी होती. परंतु तसे न होता उपचारांत सलाइनसारखे आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने उपचार व्यवस्थेवर त्याचा विपरित परिणाम होतो आहेबहुतांश रुग्णांना थेट शरिरात इंजेक्शन देणे वैद्यकीयदृष्ट्या योग्य नसते. त्यामुळे अशी इंजेक्शन्स रुग्णांना १०० किंवा २५० मिलीलीटरच्या सलाइनमधून दिली जातात. या सलाइनचा काटकसरीने वापर सुरू आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांनाही जिल्हा रुग्णालयांकडूनच औषधांचा पुरवठा केला जातो. परंतु, जिल्हा रुग्णालयातच पुरेसा साठा शिल्लक नसल्याने ग्रामीण भागातील संबंधित रुग्णालयांनाही सलाइनचा पुरवठा करताना हात आखडता घेतला जातो आहे. खासगी औषध विक्रेत्यांकडून सलाइन खरेदी करण्याची वेळ येऊ नये याकरिता पुरेशा प्रमाणात त्यांची उपलब्धता करावी, अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक व्यक्त करीत आहेत.

पंधरा दिवस पुरेल एवढा सलाइनचा साठा सध्या उपलब्ध आहे. औषधे खरेदी करण्यासाठी निधी मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला होता. निधी मंजूर झाला असून खरेदीची प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांना पुरेशा औषधांचा पुरवठा होईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *