मुंबईतील काँग्रेस नेता सागर बंगल्यावर, ‘त्या’ सात आमदारांमध्येही नव्हतं नाव, राजकीय वर्तुळात खळबळ

Khozmaster
2 Min Read

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे. कधी विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांत प्रवेश करताना दिसतात, तर कुठे महायुतीत तिकीट मिळण्याची शक्यता धूसर होताच, इच्छुकांचा मविआकडे ओढा वाढतो. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला रामराम करत भाजप प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने आता भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोणी घेतली फडणवीसांची भेट?

काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आणि आमदार अमिन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. परंतु आपण केवळ गणपतीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असं अमिन पटेल म्हणाले.

भेटीगाठीचं कारण काय?

माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमिन पटेल म्हणाले, की मी दोन गोष्टींसाठी आलो होतो. एक म्हणजे गणपतीच्या शुभेच्छा दिल्या. दुसरं म्हणजे परवा ईद ए मिलाद आहे. त्यानिमित्त जुलूस काढायचा आहे. तर त्यासाठी पोलिसांची विशेष परवानगी हवी असल्यामुळे ही भेट घेतल्याचं पटेल म्हणाले.

कोण आहेत अमिन पटेल?

६१ वर्षीय अमिन पटेल हे काँग्रेसचे नेते असून खोजा इस्माइली मुस्लीम समाजाचे नेतृत्व करतात. ते सलग तीन वेळा विधानसभा आमदार राहिले आहेत. त्यांनी मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे तीनदा प्रतिनिधित्व केले आहे

‘त्या’ सात आमदारांमध्ये समावेश नाही

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे. त्यापैकी जितेश अंतापूरकर यांनी भाजपचा हात धरलाही. तर झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. मात्र अमिन पटेल या सातांमध्ये नसतानाही त्यांनी भाजप नेत्यांची भेटगाठ घेतल्याने संशय वाढला. परंतु पटेल यांनी ही भेट कामानिमित्त असल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *