गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाके उडाले, ११ महिला होरपळल्या, नागपुरात धक्कादायक प्रकार

Khozmaster
2 Min Read

नागपूर : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. फटाके उडवताना निष्काळजी बाळगल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. इमारतीवर फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना काही फटाके उडून जमिनीवर आले. या दुर्घटनेत ११ महिला भाजल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अंगावर काटा आणणारा या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गणपती विसर्जन मिरवणुकीत बुडून भक्तांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असतानाच हा विचित्र प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाक्याच्या आतषबाजीमुळे दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये ११ महिला भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील निर्माणाधीन इमारतीवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. त्यापैकी काही फटाके पेटवल्यानंतर वर न जाता, खालच्या दिशेने उडाले. हे फटाके मिरवणुकीत सहभागी झालेल्या किंवा रस्त्याच्या कडेला उभं राहून मिरवणुकीचा आनंद घेणाऱ्या लोकांच्या अंगावर जाऊन पडले.

इमारतीवरील फटाके उडून खाली पडले

गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवस्नेही गणेशोत्सव मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी श्रीकृष्ण मंदिराजवळील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर फटाका शोची व्यवस्था करण्यात आली होती. हवेत जाणारे फटाके वरच्या दिशेने न जाता, खाली आले. रस्त्याच्या कडेला उभे राहून मिरवणूक पाहणाऱ्या गणपती बाप्पांच्या भक्तांवर फटाक्यांच्या ठिणग्या उडाल्या. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

११ महिला गंभीररित्या भाजल्या

या अपघातात ११ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. चार महिलांना उमरेडमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिलांची प्रकृती स्थिर आहे, मात्र दोघी जणींना जास्त दुखापत झाली आहे. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर विशेष लक्ष देऊन आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *