रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात काका व पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण अनंत दरडी (३५) व रामचंद्र देवजी दरडी (६५ दोघेही रा. दरडीवाडी, नाणीज) आशी या दोघांची नावे आहेत. हे आपल्या कामासाठी जात असताना मागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.मिऱ्या-नागपूर महामार्गावरील नाणीज जुन्या मठाजवळ गुरूवारी सकाळी डंपर-मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. हे काका-पुतण्या गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डिंगच्या कामासाठी नाणीज येथून पालीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. याचदरम्यान नाणीज येथील जुन्या मठाजवळ हा भीषण अपघात झाला.या दोघांना परिसरातील नागरिकांनी तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तत्पूर्वीच या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अरुण दरडी यांच्यावर जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात तर रामचंद्र दरडी यांचे पाली ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.अरुण याचा या परिसरात मोठ्या संपर्क असून तो व्यवसायिक होता. चुलते रामचंद्र देवजी दरडी यांना त्याने आपल्याकडे मदतीसाठी ठेवले होते. या घटनेचे वृत्त कळताच पंचक्रोशीतील अनेकांनी नाणीज येथे धाव घेतली. दोघे दरडीवाडी नाणीज येथील राहणारे असून अरुण दरडी हा तरुण वेल्डींगचे काम करतो. या अपघातामुळे नाणीज परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अरुण दरडी यांच्या मागे वडील, भाऊ असा परिवार असून रामचंद्र दरडी यांच्या मागे पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. अपघातानंतर घटनास्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ऐन. ऐन. कदम हे करीत आहेत.
Users Today : 18