रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील युवकाला पडलेल्या स्वप्नावरून खेड भोस्ते घाटातील एका मृतदेहाचा शोध लागला आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी मिळालेल्या या अनोळखी मृतदेह प्रकरणी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. योगेश पिंपळ आर्या याला हे स्वप्न पडले त्या युवकाचा वावर गेले काही दिवस खेडमध्येच असल्याची माहिती आता समोर आली आहे.योगेश आर्या हा युवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आहे. त्याच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर अनेक व्हिडिओ आहेत, या सगळ्याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र हा मिळालेला मृतदेह कोणाचा हे शोधण्याचं मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्टही करण्यात आली आहे. मृतदेहाजवळ मिळालेले कपडे, शूज, बॅग या वस्तू मृतदेहाजवळ मिळाल्या आहेत.रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा परिषद जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या तीन टीम या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे खेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे अधिक तपास करत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आजगांव येथील योगेश आर्या हा युवक खेड पोलीस स्थानकात दाखल झाला. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे’. यावरून अज्ञात व्यक्तीचे मृत्यू प्रकरण समोर आले आहे. या सगळ्याची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.स्वप्न पडलेल्या योगेश आर्या या युवकासंदर्भात आवश्यक तांत्रिक माहिती तसेच हा मृतदेह कोणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला या सगळ्याची तांत्रिक माहितीचा तपास रत्नागिरी पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून खेड येथे भेट देत त्यांनी या संदर्भात तपासासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता लवकरच या संदर्भात चौकशी व तपासांती कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Users Today : 18