वंचितकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर! फडणवीसांच्या विरोधात लढणार आंबेडकरांचा युवा शिल्लेदार

Khozmaster
2 Min Read

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून अन्य पक्षांच्या एक पाऊल पुढे टाकले. पक्षाने यावेळीही उमेदवारांच्या नावासमोर त्यांची जात नमूद करून सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून युवा चेहरा विनय भांगे यांच्यावर डाव लावला आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकांची चाहुल सुरु झाली आहे. सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपात गुंतलेली असताना, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज बाजी मारत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

११ मतदारसंघातील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

रावेर- शमिभा पाटील (लेवा पाटील), सिंदखेड राजा- सविता मुंडे (वंजारी), वाशीम- मेघा डोंगरे (बुद्धिस्ट), साकोली- डॉ. अविनाश नान्हे (ढिवर), नांदेड दक्षिण- फारुख अहमद (मुस्लिम), लोहा- शिवा नारंगळे (लिंगायत), औरंगाबाद पूर्व- विकास दांडगे (मराठा), शेवगाव- किसान चव्हाण (पारधी-आदिवासी), खानापूर- संग्राम माने (वडार). सिंदखेड राजा मतदारसंघातून सविता मुंडे यांनी मागील वेळी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढविली होती.

कोण आहेत विनय भांगे?

सगळ्या राज्याचे लक्ष लागलेल्या, देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात वंचितने विनय भांगे या युवा चेहऱ्याची उमेदवारी घोषित करीत आश्चर्याचा धक्का दिला. कोण आहेत भांगे अशी चर्चा सुरु झाली. एमबीए व कायद्याचे शिक्षण घेतलेले विनय भांगे, वंचितचे सक्रीय सदस्य आहेत. आंबेडकरांनी काढलेल्या चार हजार किलोमिटर्स अंतराच्या आरक्षण बचाव रॅलीत ते सक्रिय होते. दीक्षाभूमी बचाव आंदोलनाचे नेतृत्व भांगे यांनी केले. दीक्षाभूमी समिती बरखास्त करण्याची मागणी केली. दीक्षाभूमी स्वच्छता अभियान, स्वच्छ-सुंदर बुद्ध विहार अभियान राबवले. गेल्या निवडणुकीत ते वंचित कडून उत्तर नागपुरातून लढले. मात्र, अपेक्षित मते मिळाली नाही. त्यांना ५ हजार ५९९ (२.८६ टक्के) मते मिळाली.

वंचित-गोंगपा एकत्र येणार?

वंचित बहुजन आघाडीने गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा गोंडवानाचे प्रदेशाध्यक्ष हरिश उईके यांनी शुक्रवारी केली. वंचित व गोंगपाच्यावतीने येत्या ६ ऑक्टोबर रोजी कस्तुरचंद पार्क येथे सत्ता संपादन परिषद आयोजित केली आहे. वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मुख्य भाषण होईल. परिषदेसाठी वंचितचे राहुल दहिकर, अरविंद सांदेकर, सिद्धांत पाटील, गोंगपाचे बापू मडावी, राजेश इरपाते, नामदेव शेडमाके आदी तयारीला लागले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *