प्रवाशांसाठी कामाची बातमी; STमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध, आता फोनवर होणार तक्रारींचे निवारण

Khozmaster
2 Min Read

मुंबई : ‘आगार हद्दी’च्या वादामुळे प्रवाशांच्या तक्रार निवारण्याला लागणारा विलंब टाळण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने अनोख्या पद्धतीने उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या चालकांच्या आसनामागील बाजूस संबंधित स्थानक प्रमुख, आगार प्रमुख, कार्यशाळा अधीक्षक यांचे संपर्क क्रमांक झळकणार आहेत. प्रवाशांनी या क्रमांकावर तक्रार करून तातडीने निवारण करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. त्यामुळे अडचणीतील एसटी प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.प्रवाशांशी चालक-चाहकांचे असभ्य वर्तन, बसमध्ये अस्वच्छता, बस सुस्थितीत नसणे, थांब्यावर गाडी न थांबवणे, उड्डाणपुलांवरून गाडी नेणे, थांब्याच्या अलीकडे प्रवाशांना उतरवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे, गाडी चालवताना चालकांकडून मोबाइलचा वापर अशा तक्रारी प्रवाशांना प्रवासादरम्यान भेडसावतात. चालक-वाहकांकडे तक्रार करून तक्रारींचा निपटारा होत नाही. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करतच प्रवास पूर्ण करावा लागतो, प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने महामंडळाने याची गंभीर दखल घेतली असून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

तक्रारीचे निवारण तातडीने होईल

एसटी बसमध्ये संबंधित आगार आणि स्थानक प्रमुखांचा क्रमांक प्रसिद्ध करण्यात येत होता. महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसगाड्या दाखल होत आहेत. यामुळे सर्वच बसमधील प्रवाशांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी संपर्क क्रमांक लावण्यात येणार आहेत. संबंधित बस आगार प्रमुख, स्थानक प्रमुख यांचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिले जातील. या तक्क्रारींवर फोन केल्यास या तक्रारीचे निवारण तातडीने होईल, अशी आशा एसटी प्रवाशांना आहे.

प्रवाशांना आवाहन

प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास समस्येचे किंवा तक्रारीचे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. प्रवाशांनी वैध तक्रारी करण्यासाठी या संपर्क क्रमांक सुविधांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *