अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात, आज सुनावणीची शक्यता; याचिकेत नेमकं काय?

Khozmaster
3 Min Read

मुंबई : ‘माझ्या मुलाचा चकमकीत मृत्यू झाला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या, हा सर्व बेबनाव आहे. या कृत्यामागे राजकीय हेतू आहे’, असा आरोप करत मृत आरोपी अक्षय शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली आहे. या कथित चकमकीबरोबरच बदलापूर लैंगिक शोषणाबाबतच्या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा आदेश देण्याची विनंतीही शिंदे यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे.‘बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षयला दुसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिस वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बायपास येथे त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. त्यात सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणार्थ यांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला’, असे राज्य सरकार व पोलिसांनी म्हटले आहे. तर ‘ही चकमक व संपूर्ण घटनाक्रम अत्यंत संशयास्पद आहे’, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, अक्षयच्या वडिलांनी अॅड. अमित काटरनवरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तातडीने ही याचिका केली आहे.बदलापूरमधील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर मुंबईतील साकीनाका येथील एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरणही अॅड. अमित यांनी मुलीच्या आईच्या याचिकेच्या निमित्ताने न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले होते. त्याची खंडपीठाने दखल घेतली होती. त्यावेळी त्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबाला कायद्यातील तरतुदीप्रमाणे अर्थसहाय्य देण्याची ग्वाही सरकारतर्फे देण्यात आली होती. तरीही अद्याप पीडित कुटुंबाला अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे अमित यांनी मंगळवारी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत खंडपीठाने सरकारी वकिलांकडून माहिती मागवली. त्याचवेळी अमित यांनी अक्षय शिंदे चकमकीच्या मृत्यूबाबत त्याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेची माहिती खंडपीठाला दिली. त्यानंतर खंडपीठाने याप्रश्नी आज (बुधवारी) सुनावणी घेण्याचे संकेत दिले.

याचिकेत म्हणणे काय‌?

‘कथित चकमकीच्या घटनेच्या काही तास आधीच आम्ही अक्षयची भेट घेतली होती. त्याने मनी ऑर्डर मिळण्याबाबत चिठ्ठी दिली. त्याचबरोबर आरोपपत्र दाखल झालेले असल्याने मला जामीन कधी मिळेल, अशी चौकशी आमच्याकडे केली. आम्ही प्रयत्न करत असल्याचे म्हटल्यावर तो आशावादीही होता. तो मानसिकदृष्ट्याही स्वस्थ दिसत होता. त्यामुळे तो असे टोकाचे कृत्य करेल, असे वाटत नाही. शिवाय फटाके फोडायला व रस्ताही ओलांडायला घाबरणारा पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर गोळीबार करेल यावर आमचा विश्वासच बसत नाही. हा सर्व प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. त्याच्याविरोधात खटला चालवून न्याय करणे आवश्यक असताना बनावट चकमकीच्या माध्यमातून त्याला संपवण्यात आले आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय येत आहे. त्यामुळे याची उच्च न्यायालयाच्याच देखरेखीखाली सखोल चौकशी होणे गरजेचे आहे’, असे म्हणणे अण्णा शिंदे यांनी याचिकेत मांडले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *