मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळ्याच्या फेरउभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे २० कोटी रुपये खर्च करून शिवरायांचा साठ फुटी भक्कम पुतळा उभारण्यात येणार आहे. नवा पुतळा स्थानिक हवामान आणि इतर संकटांना तोंड देत १०० वर्षे भक्कम स्थितीत राहील, अशी हमी संबंधित कंत्राटदाराला द्यावी लागणार आहे.
नवा पुतळा उभारण्याचे आश्वासन
नौदल दिनानिमित्त मालवणच्या राजकोट येथे चार डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फुटी शिवपुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. अवघ्या आठ महिन्यांत, २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळल्याने, त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले. या कामात भ्रष्टाचार झाल्याची टीका करून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना माफीही मागितली. राज्य सरकारने शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते.
निविदा प्रक्रिया सुरू, २० कोटी रुपये खर्च गृहित
आता महायुती सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाग कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला असून, पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
शंभर वर्षांची खात्री
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा नवा पुतळा स्थानिक हवामान आणि इतर संकटांना तोंड देत १०० वर्षे भक्कम स्थितीत राहील, याची खात्री संबंधित कंत्राटदारास घ्यावी लागणार आहे. तशी अटच या निविदेत आहे. पुढील १० वर्षे पुतळ्याची देखभाल संबंधित कंत्राटदाराला करावी लागेल. आयआयटीच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुभवी शिल्पकाराकडून हा पुतळा उभारण्याचे काम करून घेण्यात येणार आहे.