धुळे : शासनाच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र संग्राम प्रोजेक्ट अंतर्गत संगणक परिचालक १३ वर्षापासून तुरळक मानधनावर काम करीत आहेत. या परिचालकांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. उलट कंपनीचा ठेका संपल्यामुळे संगणक परिचालक तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न परिचालकांसमोर आहे. त्यातच शिंदखेडा पंचायत समितीच्या इमारतीत मालपुर ग्रामपंचायतचे संगणक परिचालक राजेंद्र श्रीराम पानपाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव केल्याने अनर्थ टळला.
तुटपुंजे मानधन
शासकीय कामकाज गतिमान व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र संग्राम प्रोजेक्ट सुरू केला आहे. या अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक मानधनावर नियुक्त करण्यात आले. या परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु गेल्या १३ वर्षापासून याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. वेळोवेळी विविध कंपन्यांना या प्रोजेक्टचा ठेका दिला गेला. परिचालकांना सात हजार रुपये मानधनावर काम करावे लागत होते. तुटपुंजे मानधन मिळत असले तरी देखील परिचालक सोपविण्यात आलेले काम प्रामाणिकपणे करत आले आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ असल्याचा आरोप देखील राजेंद्र पाटील यांनी केला आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा?
या प्रोजेक्टचा संबंधित कंपनीला दिलेला ठेका संपुष्ठात आला आहे. नवीन ठेका देण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. गेल्या तीन महिन्यापासून तालुक्यातील संगणक परिचालक मानधनापासून वंचित आहेत. मानधन नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न परिचालकांपुढे आहे. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मालपुर ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक राजेंद्र श्रीराम पानपाटील (रा.शिंदखेडा) यांनी काल शिंदखेडा पंचायत समितीच्या इमारतीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
रेशन दुकानातून प्लास्टिकच्या तांदळाचा पुरवठा?
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदळाचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार सरपंच मेघा संदीप निकम यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे केली आहे. थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदुळाचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सोमवारी सरपंच मेघा संदीप निकम यांच्याकडे केली. सरपंचांनी तहसीलदारांकडे तक्रार केली.