मुंबई : जगभरात श्रीमंतांची संख्या वाढत असताना धनाढ्य लोकांच्या संपत्तीत आणखी भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी शंभर अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील होणं एखाद्या स्वप्नासारखं वाटायचं तर आता या क्लबमध्ये असंख्य लोकांचा समावेश आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार (अब्जाधीश निर्देशांक) जगभरातील केवळ १८ लोकांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक असून यामध्ये भारतातील केवळ मुकेश अंबानी आणि गौतम अदानींचा समावेश आहे तर सर्वाधिक लोक अमेरिकेतील आहेत. दरम्यान, आता श्रीमंतांचा आणखी एक खास क्लब तयार झाला असून या क्लबमध्ये केवळ तीन जणांची नावे आहेत.
अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल
२०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे होती ते अंबानी किंवा अदानी नाही तर एलन मस्क आणि जेफ बेझोस होते. एलन मस्क टेस्ला आणि स्पेसएक्स यासारख्या कंपन्यांचे सहसंस्थापक आहेत तर जेफ बेझोस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनचे संस्थापक आहेत. एलन मस्क यांची एकूण संपत्ती २६८ अब्ज डॉलर्स आहे तर बेझोस या क्लबमध्ये २१६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच आता या यादीत तिसऱ्या कोट्यधीशाचाही प्रवेश झाला असून या अब्जाधीशाचे नाव मार्क झुकेरबर्ग आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क यांची एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलर्स झाली असून या एलिट यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
यावर्षी कुणी केली सर्वाधिक कमाई
यावर्षी सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत मार्क झुकरबाग आघाडीवर आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मार्क यांनी यावर्षी आतापर्यंत ७१.८ अब्ज डॉलर्सची कमाई केली असून याच कालावधीत मार्कनंतर Nvidia चे अध्यक्ष जेसन हुआंग आहरेत ज्यांनी आतापर्यंत ६१.८ अब्ज डॉलर्स खिशात घेतले. त्याचवेळी, मुकेश अंबानी यांनी या वर्षात आतापर्यंत १६.७ अब्ज रुपये कमावले आणि गौतम अदानी यांनी सुमारे २१ अब्ज डॉलर्सची कमाई केली.
अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानींची स्थिती
दुसरीकडे, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींची संपत्ती ११३ अब्ज डॉलर तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींकडे १०५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.