जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेत दणका; मराठा आरक्षणावर शहांना रामबाण उपाय सापडला? कानमंत्र दिला!

Khozmaster
2 Min Read

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकल्यानं महायुतीचा मराठवाड्यातील व्हाईटवॉश टळला. गेल्या निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यात ४ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारांनी झटका दिला. मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला. यानंतर आता भाजपनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. पैकी ३० जागा जिंकण्याचं लक्ष्य महायुतीनं ठेवलं आहे.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यात १६ जागा जिंकल्या होत्या. त्या खालोखाल शिवसेनेनं १२ जागांवर यश मिळवलं होतं. केंद्रीय मंत्री अमित शहांनी विदर्भ, मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. विधानसभेच्या ३० जागा जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या.गेल्या वर्षभरापासून जालन्यात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. आंदोलनं, उपोषणाच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्या रडारवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानं मराठा समाजाचा सर्वाधिक भाजपवर आहे. लोकसभेत हेच चित्र दिसलं. मराठवाड्यात भाजपचा सर्व जागांवर पराभव झाला आहे. हाच मुद्दा शहांसोबतच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.मराठा आंदोलन आणि जरांगे फॅक्टरबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर शहांनी हा विषय आमच्यावर सोडा, असं उत्तर दिलं. ‘गुजरातमध्ये आम्ही अशाच आंदोलनाचा सामना केला होता. तिथे पटेल समाजाचं आंदोलन सुरु होतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय आमच्यावर सोडा. तुम्ही बूथवरील मतदान वाढवण्यावर लक्ष द्या,’ अशा सूचना शहांनी दिल्या. जातीपातीवर निवडणूक गेल्याचा फटका भाजपला लोकसभेत बसला. त्यामुळे विधानसभेला त्याच्या पलीकडे जाऊन धार्मिक मुद्द्यावर निवडणूक नेऊन मतविभाजन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हिंदुत्त्वाची लाईन मोठी केल्यास जातीपातीची रेष त्यापुढे आखूड ठरेल, असा भाजपच्या चाणक्यांचा होरा आहे.पक्षाच्या विजयात कार्यकर्त्यांची भूमिका मोलाची असते. त्यामुळे त्यांनी नेत्यांच्या सोबतीनं, एकजुटीनं काम करावं. कार्यकर्त्यांनी बूथवर जावं. बूथ मजबूत करावा. आपला बूथ मजबूत असेल तर मग आपला विजय नक्की आहे, असं म्हणत शहांनी कार्यकर्त्यांमध्ये जोष भरला. अमित शहा पुढील आठवड्यात कोकण, मुंबईतील जागांचा आढावा घेणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *