मिशन विधानसभा! ३ विभाग, १७८ जागा; वर्षावर साडे चार तास चर्चा; महायुतीच्या बैठकीतील १० मुद्दे

Khozmaster
2 Min Read

मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं जागावाटप बरंच रखडलं. त्याचा फटका महायुतीला बसला. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्यानं प्रचारास पुरेसा वेळ न मिळाल्यानं अनेक जागांवर महायुतीचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीत तीच चूक टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जागावाटप लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर काल रात्री तब्बल साडे चार बैठक झाली. ही बैठक मध्यरात्री तीन वाजता संपली. त्यात जागावाटपावर चर्चा झाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत समन्वय राखण्याबद्दल, जनहिताचे निर्णय तळागाळात पोहोचण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. जागावाटप लवकरात लवकर मार्गी लावून प्रचाराला लागण्याची रणनीती या बैठकीत ठरली.पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अधिकाधिक जागा जिंकण्याबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विदर्भात विधानसभेच्या ६२, पश्चिम महाराष्ट्रात ७० आणि मराठवाड्यात ४६ जागा आहेत. या तीन भागांतील जागांची बेरीज १७८ वर जाते. त्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकायची असल्यास हे तिन्ही भाग महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला या तिन्ही विभागांमध्ये महायुतीची प्रचंड पिछेहाट झाली आहे.

बैठकीत काय झालं?
१. विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्रात जास्त जागा निवडून आणण्यावर एकमत
२. प्रत्येक पक्षातील अंतर्गत वाद ही प्रत्येक पक्षातील नेत्यांची जबाबदारी
३. नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर एकमत
४. स्टँडिंग सीट तसंच चिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा
५. राजकीय आणि जातीय समीकरणांसंदर्भात विचार करुनच उमेदवार ठरवणार
६. जिंकून येणाऱ्या जागा, आणि मेहनत कराव्या लागणाऱ्या जागांचा विचार
७. वचननाम्यात नागरिकांशी निगडीत मुद्द्यांना प्राधान्य देण्यावर भर
८. प्रचारसभांची जबाबदारी, नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा
९. निवडणुकीला सामोरे जाताना वादग्रस्त मुद्दे प्रकर्षानं टाळा
१०. निवडणुकीतील तिन्ही पक्षांची भूमिका एकच असायला हवी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *