मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप रविवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी एक्सवरून दिली. पहिल्याच दिवशी या योजनेतील एकूण ३४ लाख ७४ हजार ११६ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वाटप पूर्ण झाले असल्याची घोषणा तटकरे यांनी केली. या माध्यमातून ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
सर्व पात्र भगिनींना महिनाअखेरपर्यंत लाभ
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप लवकरच करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. हे दोन्ही हप्ते एकाचवेळी लाभार्थ्यांच्या हातात जमा करण्यात येतील, असेही बोलले जात होते. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व लाभार्थ्यांचे याकडे लक्ष होते. अखेर रविवारी तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप सुरू झाले. उर्वरित भगिनींच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिनाअखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याची माहिती यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या विविध योजनांसह विकास प्रकल्पांना निधीची चणचण
दरम्यान, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवर काही हजार कोटी रुपये खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या विविध योजनांसह विकास प्रकल्पांना निधीची चणचण जाणवत आहे. पीक विमा योजनेचे पैसे मिळत नसल्याने जोरदार टीका होत असताना शेतकऱ्यांना ८१४ कोटी रुपये तातडीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज, सोमवारी (३० सप्टेंबर) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाइन प्रणालीद्वारे हा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांची सातत्याने मागणी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ‘लाडकी बहीण योजने’च्या जास्तीत जास्त लाभाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने इतर विभागांच्या निधीला कात्री लावली आहे. राज्यातील फळपिक विम्याचे गेल्या वर्षीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पुढील महिन्यात या योजनेंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्यांना ८१४ कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ‘गोड’ होणार आहे.