मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
राऊत-नड्डा आणि ठाकरे-फडणवीस भेटीगाठी
शिवसेना खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओतून केला आहे.
दिल्ली दौऱ्यात काय झालं?
सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. जाताना सोबत कोण कोण होतं, तिथे जाऊन त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि काय काय ठरलं, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केलं.
ठाकरे गटावर वंचितचे आरोप
वंचित बहुजन आघाडीला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचं पक्कं माहिती आहे. मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलं आहे, असं मोकळे म्हणाले.महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहिल्या, तर काही उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या, तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी ही माहिती जनतेसमोर ठेवत असल्याचं मोकळे यांनी सांगितलं.लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासाठी बोलणी सुरु केली होती. ठाकरे गटासोबत वंचितची आघाडी पुढच्या टप्प्यांवरही गेली होती. मात्र जागावाटपावरुन बोलणी फिस्कटली आणि दोघांची फाटाफूट झाली.