आज चिखली मतदारसंघातील आन्वी, चांडोळ आणि जांभोरा येथे तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे भूमिपूजन केले.
या उपक्रमांतर्गत चिखली मतदारसंघात आणखी १८ सोलर पार्कला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आणि स्वस्त ऊर्जा मिळेल. ही सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरणार आहे. यामुळे त्यांना २४ तास वीजपुरवठा होईल, आणि लोड शेडिंगची समस्या कायमची संपुष्टात येईल.

⦿ सौरऊर्जेचा शेतकऱ्यांना फायदा:
सध्याच्या काळात, विजेच्या वाढत्या मागणीनुसार अक्षय ऊर्जा हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. याच उद्दिष्टाने आन्वी, चांडोळ आणि जांभोरा येथे अनुक्रमे ७ मेगावॅट, ५ मेगावॅट आणि ३ मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक वीज मिळेल आणि त्यांच्या कृषी पंपांसाठी २४ तास वीज उपलब्ध होईल.

⦿ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०:
राज्यातील कृषीविभागाला दिवसाही अखंडित वीज पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प गावांच्या जवळच उभारण्यात येत आहेत. २०२५ पर्यंत एकूण ७००० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कृषी क्षेत्रासाठी शाश्वत ऊर्जेचा मोठा फायदा होईल.

⦿ आणखी १८ सोलर पार्कला मंजुरी:
या भूमिपूजनानंतर आणखी १८ ठिकाणी सोलर पार्कला मंजुरी मिळाली आहे. या गावांमध्ये धाड, बोदेगाव, सावळी, इरला, सोयगाव, दहिद खुर्द, पिंपरखेड, वरखेड, गोदरी, भोकर, अंबाशी, धोत्रा भनगोजी, वळती, कवठळ, ऐनखेड, किन्ही नाईक, मोहदरी, आणि भोकर यांचा समावेश आहे. या गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळेल, ज्यामुळे हे गावे कायमस्वरूपी लोड शेडिंगमुक्त होतील.

⦿ महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प आणि उपक्रम:
मतदारसंघातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विजेची उपलब्धता सोपी करण्यासाठी उदयनगर येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय उभारण्यात येत आहे. या कार्यालयामुळे ५० गावांच्या रहिवाशांना तक्रारींचे निवारण स्थानिक पातळीवरच करता येईल. याशिवाय, मतदारसंघात ९ कोटी रुपयांच्या विविध ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यात नवीन रोहित्रे, उच्चदाब वाहिन्या, आणि विजेच्या जोडण्या यांचा समावेश आहे.
हे सर्व उपक्रम मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या सोलर पार्कमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल.
या भूमीपूजन कार्यक्रमासाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता मंगलसिंह चौहान, उपविभागीय अभियंता वक्टे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, भाजपा चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सिंधुताई तायडे, सरपंच विष्णू शेळके, मंगेश इंगळे, रमेश इंगळे, अरुण सरनाईक, गुलाबसिंग सोनारे, संजू वाघमारे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अनिल पाटील, शिवाजी शिराळे, माजी सरपंच कृष्णा चौथे, रमेश खेडेकर, सिद्धेश्वर परिहार आणि सतीश काकडे यांच्यासह स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 5