बुलढाणा :-(कार्यालय प्रतानिधी)
बुलडाणा-मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण ओवरफ्लो झाले असून शंभर टक्के भरले आहे. काल शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या अनेक गांवासह मलकापूर शहरातील काही वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.अनेक घरांत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. दाताळा गावात अक्षरशः हाहाकार उडाल्याचे चित्र आज शनिवारी दिसून आले.
सततच्या पावसाने धरणातील जलसाठा वेगाने वाढला शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर धरण शंभर टक्के भरलं आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने मध्यरात्री च धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. दरवाजा क्रमांक १ (एक),११(अकरा) आणि ६ (सहा)हे दोन इंचाने उघडण्यात आले. पूर नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. यातून ४१९ क्यूसेकं इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुरामुळे मलकापूर येथील नळगंगा नदी पात्रानजीक असलेल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने रोहिदास नगर, सुभाषचंद्र बोस नगर, पारपेठ या सखल भागातील नागरी वस्त्यांतील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे गोर गरिबांचे गृहोपयोगी साहित्य, धान्य ,कपडे आदींचे नुकसान झाले आहे.
Users Today : 7