सिंदखेड राजा:-(दत्ता हांडे)
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी .डॉ.किरण पाटील यांनी २४ सिंदखेडराजा मतदार संघाला भेट दिली.
तसेच मतदारसंघातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा करून पाटील यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्य कशी पार पाडली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक सेल च्या नोडल अधिकाऱ्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेतले तसेच असलेल्या समस्यांना कशा पद्धतीने सोडवले पाहिजे याबद्दल सांगितले.
ईव्हीएम,व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली,टपाली मतपत्रिका, इव्हीएम शी संबंधित बाबींची योग्य काळजी घेऊन त्यात कसलीही चूक होऊ नये याबद्दल सूचना देण्यात आल्या.
आजच्या बैठकीमध्ये पाटील यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन करुन विधानसभा निवडणुक योग्य प्रकारे पार पाडावी असे सांगितले. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्व नोडल अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केले असेच काम आत्ता विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्व नोडल अधिकाऱ्यांना करावयाचे आहे असे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी आजच्या बैठकीसोबतच २४ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी भेट दिली.सदर भेटीमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम, मतमोजणीचे ठिकाण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे ठिकाण,निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन या सर्व ठिकाणांची पाहणी करून काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
आजच्या या बैठकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ,गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश माहोर,मुख्याधिकारी नगरपरिषद सिंदखेड राजा प्रशांत व्हटकर,निवडणुक नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घोटकर,नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर,नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीणकुमार वराडे,नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव,नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार,पोलीस निरीक्षक सिंदखेडराजा ब्रम्हदेव शेळके,नोडल अधिकारी प्रसारमाध्यम अंकुश म्हस्के उपस्थित होते.
Users Today : 11