क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले एका वर्षासाठी ६ जिल्ह्यातून तडीपार कारवाई अन्यायकारक; शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष

Khozmaster
4 Min Read
बुलडाणा  🙁 शाहिद शहा )
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आहे.विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यालगतच्या सर्व जिल्ह्यातून डॉ टाले यांना तडीपार करण्यात आले आहे.रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गेल्या तेरा वर्षापासून डॉ. ज्ञानेश्वर टाले शेतकरी चळवळीत काम करीत आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. राजकीय आकसापोटी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत असून, झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचा रॊष कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करीत आहेत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
      डॉ. ज्ञानेश्वर टाले यांची वर्तणूक चांगली नाही, त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळातील सण-उत्सव आणि निवडणुका पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत कलम 56 (1)(अ )(ब )मुंबई पोलीस कायदा 1951 या कायद्याचा आधार घेत,मेहकरचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एका वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यातुन तडीपार केले आहे. 4 मार्च रोजी सदरचे आदेश पारित करण्यात आले. डॉ. ज्ञानेश्वर टाले हे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचे आई-वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत तर डॉ. टाले गेल्या तेरा वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत.|
       रविकांत तुपकर यांचे ते अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत. तुपकर यांच्या नेतृत्वात डॉ. टाले यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मेहकर मतदार संघात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मजबूत बांधणी त्यांनी केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना अपक्ष असूनही मेहकर मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबरीत मते मिळाली यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे महत्त्वाचे योगदान ठरले हे विशेष..! डॉ. ज्ञानेश्वर टाले हे सराईत गुन्हेगार नाहीत, त्यांच्यावर दाखल असलेले बहुतांश गुन्हे शेतकरी आंदोलनातील आहेत. डॉ. टाले यांच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्यातील चार गुन्हे हे शेतकरी आंदोलनातील आहेत. मलकापूर येथे रेल्वे रोको आंदोलन बुलढाण्यात रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन व तुपकर यांच्या अटकेचा निषेध म्हणून दोन गावांमध्ये केलेले ठिय्या आंदोलन असे चार गुन्हे आंदोलनाचे आहेत तर दोन गुन्हे राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आले असून ते देखील गंभीर स्वरूपाचे नाहीत, शिवाय हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. असे असतानाही डॉ. टाले यांना सराईत गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर एका वर्षाच्या तडीपारची कारवाई करण्यात आल्याने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे. राजकीय दबावापोटी अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे असा रोष मेहकर मतदारसंघातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 60 अन्वये माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले आहे.
 
  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या राजकीय दबावातून झालेली कारवाई : रविकांत तुपकर
 
  डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर झालेली तडीपारीची कारवाई अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे. खरं तर हे प्रकरण तडीपारी मध्ये बसतच नाही.लोकसभा निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी खा. प्रतापराव जाधव यांच्या राजकीय दबावातून मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. शेतकरी आंदोलन व चळवळ संपवण्याचा हा डाव असून सत्तेचा सर्रासपणे दुरुपयोग केला जात आहे. परंतु आम्ही कार्यकर्ते डगमगणारे नाही, डॉ. टाले व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना व मी खंबीरपणे उभा आहे, हा अन्याय कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही फासावरही जायला तयार आहोत.अश्या कारवाया करून शेतकऱ्यांचे आंदोलन थांबणार नाही,अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18:35