लोणार तान्हाजी मापारी )
लोणार मध्ये आज, १२ मार्चला मोठे अग्रीतांडव पाहायला मिळाले. लोणी रोडवरील दुर्गा टेकडी परिसरात असलेल्या वनराईला भीषण आग लागली. या आगीत शेकडोंच्या संख्येतील वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले. याशिवाय वनराईत असलेले वन्यप्राणी मृत्युमुखी पडले, काही होरपळले.. शेकडो पक्षी भाजले, पक्षांची घरटे, पक्षांची अंडे आगीच्या भक्षस्थानी सापडले.. लोणार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा जाताना चूक केली.. जळता कचरा सोडून नगरपालिकेचे कर्मचारी निघून गेले.. तीच आग पुढे या वनराईत पसरल्याने मोठे नुकसान झाले..
प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आज लोणारला आहेत. कलेक्टर साहेब येणार असल्याने नगरपालिकेने प्रमुख रस्त्यावरील स्वच्छता सुरू केली होती. जिल्हाधिकारी तारांगण परिसरालाही भेट देणार होते. त्यामुळे लोणार नगरपालिकेने लोणी रोडवरील साफसफाई सुरू केली. कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेला कचरा जाळला.. आणि नगरपालिकेचे कर्मचारी कचरा तिथेच सोडून निघून गेले. हीच आग वनराई परिसरात पोहचली, यामुळे हजारोंच्या संख्येतील दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले. अनेक पक्षी, वन्यप्राणी या आगीत मृत्युमुखी पडले आहेत.
विशेष म्हणजे आगीची घटना लोणार नगरपालिकेला माहीत झाल्यानंतरही अग्निशामक दल वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे खाजगी टैंकर बोलावून दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टने आग विझवण्याचा प्रयत्न केला. रिसोड नगरपालिकेचे देखील अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते. मात्र अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठीचे आवश्यक साहित्य वनराईत दूरपर्यंत पोहोचले नाही. स्थानिकांनी झाडांचा पालापाचोळा तोडून जीव धोक्यात घालून आग विझवली….
काय आहे वनराई….
स्व. पुंडलिकराव बानाजी मापारी यांच्या पुढाकारातून दुर्गा टेकडी संस्थांनने अडीचशे एकर परिसरात वनराई निर्माण केली होती. यात विविध प्रकारची दुर्मिळ झाडे, याशिवाय वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड केलेली होती. या घनदाट वनराईमुळे पशु पक्षांचा किलबिलाट या वनराईत नेहमी राहत होता. आयुष्याची ३५ वर्षे स्व. पुंडलिकराव मापारी यांनी या वनराईच्या निर्माणासाठी खर्ची घातली होती. यावर्षी २९ जानेवारीला स्वर्गीय पुंडलिकरावजी मापारी यांचे निधन झाले. दरम्यान आज लागलेल्या आगीत या वनराईतील शेकडो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले. ससे, घोरपड, विविध पक्षी देखील आगीत होरपळले आहेत….