पुण्यातील इंदोरी येथे पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची प्रतिक्रिया
पुणे, 15 जून 2025: पुणे जिल्ह्यातील तळेगावजवळ इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “या घटनेचे वृत्त ऐकून मन हेलावून गेले. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, प्रशासनास मदतकार्य वेगाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत,” असे त्यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात असून, एनडीआरएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.”
आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात यश आले असून, काही लोक अद्याप बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, विभागीय आयुक्त स्वतः घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्रशासनाकडून याची चौकशी सुरू असून, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Users Today : 18