म्हैसवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; चार कुत्र्यांचा बळी सीसीटीव्हीत घटना कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर, प्रतिनिधी –

शहरालगतच्या म्हैसवाडी परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत कुत्र्यांवर हल्ले केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना प्रमोद जगन्नाथ चौधरी यांच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दीड महिन्याच्या कालावधीत चार कुत्र्यांचा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात वनविभागाला वारंवार माहिती देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
म्हैसवाडी येथील शेतकरी प्रमोद चौधरी यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ९ मार्च २०२६ रोजी रात्री बिबट्याचे स्पष्ट फुटेज रेकॉर्ड झाले असून त्यांच्या घराजवळील एक कुत्रे उचलून नेल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती चौधरी यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील तसेच वनविभागाचे अधिकारी राज शिरसाट यांना दिली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, १२ मार्च रोजी रात्री पुन्हा बिबट्याने या परिसरात हजेरी लावली. चौधरी व त्यांचा मुलगा रात्री सुमारे ११ वाजता शेतातून घरी परतले असता घराजवळील तीन कुत्री घाबरून ओरडत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर ते घरात धावत गेले असता बिबट्या थेट घराच्या खिडकीजवळ येऊन बसल्याचे पाहून त्यांचा थरकाप उडाला. जोरात आवाज करून हाकलण्याचा प्रयत्न केला तरी बिबट्या जागेवरून हलत नव्हता.
काही क्षणांतच रात्री ११ वाजून १२ मिनिटांनी बिबट्याने एक कुत्रे उचलून नेले. भीतीपोटी चौधरी कुटुंबीय घरातच थांबले. त्यानंतर पुन्हा रात्री सुमारे १२ वाजून ४२ मिनिटांनी बिबट्याने आणखी एक कुत्रे उचलून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती चौधरी यांनी वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर दिली असून त्यांना ईएम-१२८४४६ असा नोंद क्रमांक देण्यात आला आहे. सकाळी अधिकारी भेट देतील, असे सांगण्यात आले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही वनविभागाचे अधिकारी राज शिरसाट यांना व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले आहे. मात्र त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

0 9 4 0 6 8
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *