विधानभवनात जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्धा| प्रतिनिधी प्रवीण जगताप
राज्याच्या कृषीमंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर जुगार (रम्मी) खेळल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराला गांभीर्याने घेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आज मुख्यमंत्र्यांकडे कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची जोरदार मागणी केली.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले आणि युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर केले.
“शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे कृषीमंत्री”
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कृषिमंत्री कोकाटे हे यापूर्वीही वारंवार शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद वक्तव्ये करून त्यांची मनःस्ताप करत आहेत. आता विधानभवनासारख्या संवैधानिक ठिकाणी रम्मी खेळणे हे त्यांच्या जबाबदार पदाला न शोभणारे व गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे.
“लोकशाहीची थट्टा, करदात्यांचा अपमान”
पावसाळी अधिवेशन हा राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणारा महत्त्वाचा काळ असतो. या अधिवेशनावर जनता कररूपात पैसा खर्च करते. अशा महत्त्वाच्या सत्रात शेतकऱ्यांचे मुद्दे मांडण्याऐवजी जुगार खेळणे हे केवळ असंवेदनशीलच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेचीही थट्टा आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
“राजीनामा न घेतल्यास रस्त्यावर उतरू”
या प्रकारामुळे राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरीवर्गामध्ये संताप पसरला आहे. कोकाटे यांना मंत्रिपदावर ठेवणे म्हणजे सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा पुरावा ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार गट आक्रमक आंदोलन छेडेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
Users Today : 18