अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त — नेरपिंगळाई येथे धरणे आंदोलन

Khozmaster
2 Min Read

नेरपिंगळाई प्रतिनिधी

नेरपिंगळाई परिसरातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे त्रस्त झाले असून नियमित व वेळापत्रकानुसार वीजपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी वीज कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले.

शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या आठवड्यात काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्री वीजपुरवठा मिळतो. मात्र दिवसा वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. दुरुस्तीला तासन्तास वेळ लागतो, कर्मचारी अनुपलब्ध असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनाच खाजगी लाईनमनकडून दुरुस्ती करून घ्यावी लागते, ज्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो.

रात्री वीज येते, पण शेतात साप, विंचू, वन्यप्राणी आणि चोरांचा धोका असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेती करावी लागते. अनेक ठिकाणी डीपीवरील तारा लोंबकळत आहेत, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली.

“वेळापत्रक ठरवलं जातं पण त्या वेळेत वीज नसते; बिघाड दुरुस्तीला तासंतास लागतो, पिकं कोमेजतात आणि मजूर रिकामे बसतात,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनावेळी उपविभागीय अभियंता (मोर्शी) दिनेश भागवत, लेहेगाव सब स्टेशनचे अभियंता कल्पेश देवांग, शाखा अभियंता (नेरपिंगळाई) कोकणे यांनी घटनास्थळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

या आंदोलनात राहुल मंगळे, गोपाल श्रीखंडे, प्रकाश मेंढे, प्रकाश कुहेकर, विलास खाजबागे, विजय नालट, संजय मोहकर, बाळू पोटे, मनोज कोकाटे, उमेश कोकाटे, संजय सुने, निखिल वासनकर, अतुल पोटे, अंकुश डेहनकर, प्रमोद शिसट, महेंद्र शिसट, रवी वडनेरकर, अशोक देवळे, प्रभाकर टाकळे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी संघटनांनी वीजपुरवठा नियमित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *