अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १,११७ कोटींचा मदतनिधी मंजूर

Khozmaster
2 Min Read

अमरावती प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची दखल घेत शासनाने एकूण १,११७ कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. यात नुकसानीसाठी ५७० कोटी आणि रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी ५४७ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा निर्णय गुरुवारी राज्य शासनाने जाहीर केला.

जरी मदत जाहीर होण्यात थोडा उशीर झाला असला, तरी महसूल आणि कृषी विभागातील तांत्रिक समन्वयातील अडचणींमुळे हा विलंब झाला, असे भाजपाचे आमदार प्रताप अडसड आणि राजेश वानखेडे यांनी शुक्रवारी श्रमिक पत्रकार भवन, अमरावती येथे आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

सरकारचा निर्णय आणि मदतवाटपाचा तपशीलअतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांची ४ लाख ८१ हजार ५०३ हेक्टर शेती बाधित झाली होती. या नुकसानीसाठी ४९० कोटी रुपये वितरीत करण्यात येणार आहेत.

शासनाने मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढविल्यामुळे, आणखी ५५ हजार २१२ शेतकऱ्यांना ६६ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रासाठी ७९ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे.

सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण ५ लाख ४७ हजार ८७६ हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान नोंदवले गेले असून, त्या अनुषंगाने ५४७ कोटी रुपयांची विशेष मदत रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आली आहे.

रब्बी हंगामासाठी विशेष मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार प्रति हेक्टर १०,००० रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत जास्तीत जास्त ३ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी राहणार आहे.

भाजप आमदारांचा पाठपुरावा

या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी आशीष येरेकर आणि भाजपचे सर्व पाच आमदार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

या प्रसंगी आ. उमेश यावलकर, आ. प्रवीण तायडे, तसेच भाजप जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांनी सांगितले की, “शासन शेतकरीविरोधी नसून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हा मदतनिधी त्याचाच पुरावा आहे.”

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *