मानोरा (प्रतिनिधी)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती उत्सवानिमित्ताने मानोरा पोलीस स्टेशनच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी ‘वॉक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन’ करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विविध घटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेची सुरुवात लालमाती चौकातून करण्यात आली. तेथून धावपटूंनी पोलीस स्टेशन, मानोरा पर्यंत फेरी पूर्ण केली. मॅरेथॉनमध्ये मानोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, पोलीस पाटील, होमगार्ड सैनिक, पोलीस भरतीसाठी सराव करणारे युवक तसेच सेवानिवृत्त सैनिक अशा शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त सैनिक नारायण सोळंके, पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, पोलीस अधिकारी, तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
‘वॉक मॅरेथॉन’ या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सरदार पटेलांच्या एकात्मतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीरूप मिळाले.
Users Today : 18