कारंजा (प्रतिनिधी)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कारंजा पोलीस स्टेशन स्तरावर ‘वॉक फॉर युनिटी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला कारंजेकर नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘वॉक फॉर युनिटी’चे उद्दिष्ट समाजात एकता, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश पोहोचवणे हे आहे. या उपक्रमाचे आयोजन वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार संतोष इंगळे, तसेच डॉ. पंकज काटोले प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. वॉक फॉर युनिटीची सुरुवात कारंजा बायपास येथून झाली. फेरी जाणता राजा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेट बँक चौक, पोहावेस मार्गे पुन्हा बायपासपर्यंत घेण्यात आली.
या एकता फेरीतून समाजातील विविध घटकांना राष्ट्रीय एकात्मता आणि लोकसहभागाचा संदेश देण्यात आला. उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ‘रफ अँड टफ फिटनेस ग्रुप’, ‘सूर्या अकॅडमी’ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत कारंजा शहराने एकतेचा, बंधुत्वाचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारे उदाहरण घालून दिले.
Users Today : 18