निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आलेले, उद्धव ठाकरेंनी थेट अर्जच वाचला; अर्जदाराचं नाव ऐकून सारेच चकित

Khozmaster
3 Min Read

“ठिणगी पडलीय, वणवा कधीही पेटेल” — उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला

‘सत्याच्या मोर्चा’त निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका, मतदारांची नावे वगळण्याचा आरोप

मुंबई, विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली मुंबईत आयोजित ‘मतचोरीविरोधातील सत्याचा मोर्चा’ आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोशपूर्ण भाषण करत सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला.

ते म्हणाले, “लोकशाहीची बूज राखणारे आणि लोकशाहीचं नेतृत्व करणारे पक्ष आज इथे एकत्र आले आहेत. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने ही ताकद बघून घ्यावी. ठिणगी पडली आहे — वणवा कधीही पेटेल!”


“माझं पक्ष, चिन्ह, आणि वडील चोरायचा प्रयत्न झाला — आता मतांची चोरी सुरू!”

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडील चोरायचा प्रयत्न केला, आणि आता मतांची चोरी सुरू केली आहे. कारण यांची भूक काही केल्या शमत नाही,” असा बोचरा वार त्यांनी भाजपवर केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ठाकरेंनी त्यांचा उल्लेख “ऍनाकोंडा” असा करत उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट उडवला.


निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान एक धक्कादायक किस्सा सांगितला. “काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी माझ्या घरी आले आणि म्हणाले, ‘तुम्ही अर्ज केला आहे, त्याची पडताळणी करायची आहे.’ मी सांगितलं — आम्ही असा कोणताही अर्ज केलेला नाही. त्यावर त्यांनी अहवालात लिहिलं की अर्ज ‘अवैध’ आहे,” असे उद्धव यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “त्या अर्जावर नाव होतं — उद्धव बाळासाहेब ठाकरे! म्हणजे माझ्याच नावाने कोणी अर्ज करून माझं नाव मतदारयादीतून काढण्याचा प्रयत्न केला! एवढंच नाही तर माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावेही वगळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार गंभीर आहे. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘सक्षम’ या अॅपवरून हा अर्ज खोट्या नंबरवरून करण्यात आला होता. या संदर्भात मी तक्रार दाखल केली आहे.”


“न्यायासाठी कोर्टात जाणार, मतदारांनी जागरुक राहा”

उद्धव ठाकरे म्हणाले, “मतदार याद्यांतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे सर्व पुरावे घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. निवडणूक आयुक्त लाचार असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. आमच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला तीन वर्षे झाली, पण निकाल नाही.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते मतचोरीचे प्रयत्न हाणून पाडतील. पण त्याचबरोबर मतदारांनीही सजग राहणं गरजेचं आहे.”

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *