जळगाव प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणात अखेर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी गेलेले मौल्यवान दागिने आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र चर्चेत असलेल्या सीडी आणि कागदपत्रांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
दोन आरोपींना अटक, मुख्य चोर अजूनही फरार
जळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीनंतर आरोपींनी उल्हासनगरमध्ये चिराग सय्यद या व्यक्तीकडे चोरीचा माल दिला होता. त्यानंतर चिराग सय्यदने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नावाच्या सराफाकडे विक्रीसाठी सोपवला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या वस्तू परत मिळाल्या आहेत.
मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन मुख्य आरोपी — एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा — हे तिघे अजूनही फरार आहेत. तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
काय काय चोरीला गेलं होतं?
एकनाथ खडसे यांच्या घरातून चोरी गेलेल्या वस्तूंची यादी मोठी आहे —
सोनं – एकूण 68 ग्रॅम:
20 ग्रॅम गहू पोत
7 ग्रॅम कानातले
4 ग्रॅम डायमंडचे कानातले
7 ग्रॅम अंगठ्या
10 ग्रॅम गोल
20 ग्रॅमच्या चार अंगठ्या
चांदी – एकूण 7 किलो 700 ग्रॅम:
1 किलोची गदा
1 किलोचे त्रिशूल
6 चांदीचे ग्लास
2 किलो वजनाची तलवार
2 किलो वजनाचे दोन रथ
रोख रक्कम: ₹35,000
एकूण अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
सीडी आणि कागदपत्रांचं गूढ कायम
एकनाथ खडसे यांनी चोरीनंतर दिलेल्या निवेदनात घरातून कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याचा उल्लेख केला होता. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये अशा प्रकारचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं की,
“खडसे यांनी ना एफआयआरमध्ये, ना पुरवणी जबाबात अशा सीडी किंवा दस्तऐवजांचा उल्लेख केला आहे.”
त्यामुळे ‘त्या सीडींमध्ये काय होतं?’ आणि ‘त्या खरोखर चोरीला गेल्या का?’ या प्रश्नांवर अजूनही रहस्य कायम आहे.
पुढील तपास सुरू
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून चौकशी सुरू केली आहे. मुख्य आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे. चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल मिळवण्याचे आणि उर्वरित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Users Today : 18