कोलकाता :-
भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत टीम इंडियाला स्वतःच्या घरच्या मैदानावर इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात झाल्यापासून 92 वर्षांत भारत पहिल्यांदाच इतक्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे.
कमी धावसंख्येची कसोटी, पण भारतीय फलंदाज फसले
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 159 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारताने 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. सामना जवळजवळ भारतीय संघाच्या पकडीत असल्याचे चित्र यावेळी दिसत होते. मात्र दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 155 धावा करत 124 धावांचे छोटेसे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज अक्षरशः धुळधाण उडाले. संपूर्ण संघ फक्त 93 धावांवर गारद होत दक्षिण आफ्रिकेने 31 धावांनी अनपेक्षित विजयाची नोंद केली.
92 वर्षांच्या इतिहासातील विक्रमी पराभव
भारतीय संघ इतक्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना देशात कधीच पराभूत झाला नव्हता.
यापूर्वीचा सर्वात कमी धावसंख्या पाठलागातील पराभव 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत झाला होता, तेव्हा भारत 147 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला होता.
मात्र, या सामन्यातील 124 धावांचे लक्ष्य साधण्यात अपयश हे भारतीय कसोटी क्रिकेटमधील आजवरचे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे.
गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट, फलंदाजांनी निराशा
सामन्यात दोन्ही संघांचे गोलंदाज प्रभावी होते. कमी धावसंख्येचा सामना म्हणावा असा हा खेळ झाला. परंतु भारताकडून काही मोजके खेळाडू वगळता इतरांकडून कोणतेही योगदान मिळाले नाही. फलंदाजांमध्ये तालमेलच दिसून न आल्याने भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावरून खाली कोसळला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी धोक्याची घंटा
या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचे स्थानही धोक्यात आले आहे. मालिकेतील दुसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.
आगामी सामन्यात भारतीय संघ कोणत्या बदलांसह मैदानात उतरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या कसोटीत केलेली चूक पुन्हा होणार नाही, अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.
Users Today : 18