महायुती तुटली! उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर; शिंदे गटाला मोठा धक्का

Khozmaster
2 Min Read

उल्हासनगर :

राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असून, त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुती उल्हासनगरमध्ये अखेर तुटली असून, भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तिकीट वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. अशातच उल्हासनगरमधील महायुती तुटल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया यांनी महायुती होणार नसल्याचे स्पष्ट करत, शहरातील सर्व ७८ जागांवर भाजपचे उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महायुतीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी दोन वेळा संपर्क साधण्यात आला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना, साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्या दोस्ती गटबंधनाची पहिली महत्त्वपूर्ण बैठक रिजेन्सी हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत ७८ जागांच्या वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. भाजपच्या सहभागाबाबत विचारले असता, दोस्ती गटबंधनाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगत थेट उत्तर देणे टाळण्यात आले.

महायुतीबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे घेणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगवेगळ्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या राजकारणावर होणार आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *