राज्य
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून युती व आघाडीची समीकरणे निश्चित केली जात आहेत. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली असून, काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील सहभागी होणार आहे.
मात्र ज्या ठिकाणी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युती होणार नाही, त्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या प्रमुख महापालिकांसह इतर काही ठिकाणी अशी युती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या युतीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी अंकुश काकडे आणि आमदार बापू पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत महापालिका निवडणुकीतील संभाव्य युतीवर चर्चा झाल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महापालिका निवडणूक ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या मागणीमुळे नव्या पेचाची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ‘घड्याळ’ हे चिन्ह अजित पवार गटाला, तर ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाले आहे. त्यामुळे शरद पवार गट ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवण्यास तयार होतो का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या मुद्द्यावर शरद पवार गटाचा निर्णय आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
Users Today : 11