उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का; शिंदे गटात मोठी पक्षांतराची लाट

Khozmaster
2 Min Read

मुंबई 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) मधील पक्षगळती सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईत ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक आणि दिनेश कुबल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे.

दिनेश कुबल हे कलीना प्रभाग क्रमांक ८९ चे माजी स्थायी नगरसेवक असून, त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षांतर केले. यासोबतच रवींद्र घोसाळकर, राजू शेट्टी आणि विशाल कनावजे (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला आहे. या घडामोडींमुळे मुंबईतील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचे चित्र आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मनसे व शिवसेना (ठाकरे गट) यांची युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हे पक्षांतर घडले आहे. तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला संघटनात्मक धक्के बसत आहेत.

दरम्यान, पुण्यातूनही पक्षासाठी प्रतिकूल बातमी समोर येत आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हा प्रवेश आज होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, मनसेलाही फटका बसला असून, युती जाहीर झाल्याच्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली ही पक्षांतराची मालिका आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरणार आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *