मुंबई :-
गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांचाही समावेश असून, खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या रंगेहाथ पकडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कांदिवली येथील रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे (वय ३९) आणि सांताक्रूझ येथील रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघींनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी व बांधकाम व्यावसायिक अरविंद गोयल (वय ५२) यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात दाखल असलेला फौजदारी गुन्हा मिटवून देण्याच्या नावाखाली आरोपी महिलांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गोयल यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. खंडणीच्या रकमेपैकी दीड कोटी रुपये स्वीकारताना आरोपींना अटक करण्यात आली.
न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितले की, मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्या विरोधात यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. यापूर्वी अशा स्वरूपाचे आणखी गुन्हे केले आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, खंडणीची रक्कम कशी आणि कोणत्या पद्धतीने द्यायची होती, याबाबतचा सविस्तर लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे. तपासादरम्यान हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षर नमुने आणि अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुने घेणे अद्याप बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही आरोपी महिला तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही फरार आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यांनी इतर पीडितांकडूनही खंडणी उकळली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत तसेच मुंबईतील व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 8