विशेष प्रतिनिधी
सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा कल मौल्यवान धातूंकडे वाढत आहे. मात्र दागिने, नाणी किंवा बिस्कीटांच्या तुलनेत गोल्ड व सिल्व्हर ईटीएफ (Exchange Traded Fund) हा अधिक सुरक्षित, कमी खर्चिक आणि सोयीस्कर पर्याय ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, दागिने खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर मेकिंग चार्ज भरावा लागतो, जो विक्रीवेळी परत मिळत नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने दागिने फायदेशीर ठरत नाहीत. याउलट ईटीएफमध्ये शुद्धतेची हमी, कमी गुंतवणूक रक्कम, उच्च तरलता आणि कमी व्यवहार खर्च असे अनेक फायदे मिळतात.
मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी) राहुल कलंत्री यांनी सांगितले की, “गुंतवणुकीचा प्रकार व्यक्तीच्या उद्दिष्टांवर अवलंबून असतो. मात्र दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी गोल्ड व सिल्व्हर ईटीएफ अधिक योग्य आहेत.”
तर शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक नवीन माथुर यांनी ईटीएफला आतापर्यंतचा सर्वात प्रभावी गुंतवणूक पर्याय असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, डिजिटल गोल्ड लोकप्रिय होत असले तरी ते सेबीद्वारे नियंत्रित नसल्याने त्यात जोखीम असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना केवळ नियमन असलेल्या उत्पादनांनाच प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडावा, असे तज्ज्ञांचे एकमत आहे.
Users Today : 8