मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारावर होत असून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे 1.38 टक्क्यांनी घसरून 4462 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. तर चांदीचा भाव 2 टक्क्यांनी कमी होऊन 68.3 डॉलर प्रति औंस पातळीवर आला आहे.
या घसरणीचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही दिसून आला. आज सकाळी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,210 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,35,890 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
दरम्यान मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,48,080 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,35,740 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
याशिवाय पुणे आणि बंगळुरू येथेही सोन्याचे दर जवळपास याच पातळीवर आहेत.
चांदीच्या दरातही घसरण
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज सकाळी चांदीचा दर 2,44,900 रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला. गेल्या आठवड्यात मोठ्या चढ-उतारानंतर चांदीचा भाव काहीसा स्थिर झाल्याचे दिसत आहे.
सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या राजकीय तणावामुळे आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आगामी काही दिवसांतही सोनं-चांदीच्या दरात अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 5