लोणार सरोवराच्या अस्तित्वाला धोका; पाणीपातळी वाढल्याने जैवविविधता धोक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज लोणार बंद

Khozmaster
2 Min Read

लोणार प्रतिनिधी :
गेल्या सहा महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे मूळ स्वरूप धोक्यात आले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अद्वितीय मानल्या जाणाऱ्या या भू-वैज्ञानिक वारशाचे अस्तित्व सध्या गंभीर संकटात सापडले आहे.
सरोवरातील पाणीपातळी तब्बल २० ते २५ फूटांनी वाढली असून, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलला आहे. पूर्वी pH स्तर ११.५ असलेले पाणी आता ७.५ पर्यंत खाली आले असून, क्षारता (TDS) ६००० वरून ४०० पर्यंत घटली आहे. यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, सध्या येथे मासेही आढळू लागले आहेत. भविष्यात यामुळे गंभीर पर्यावरणीय परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक व धार्मिक वारसा धोक्यात
पाणीपातळी वाढल्यामुळे
अकराव्या शतकातील आई कमलजा देवी मंदिर,
सोळाव्या शतकातील गैबनशहा वली दर्गा,
तसेच इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
गर्भगृहात पाणी शिरल्याने मूर्ती व मंदिरांचे नुकसान होत असून, भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.
सांडपाणी आणि गोड्या पाण्यामुळे धोका वाढला
शहरातील सांडपाणी तसेच गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचा नैसर्गिक समतोल बिघडला आहे.
यासाठी —
धारतीर्थ, रामगया यांसारखे नैसर्गिक जलस्रोत काठावरच अडवावेत
उपसा सिंचनाद्वारे ते पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यास वापरावे
कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तातडीने सुरू करावा
अशी मागणी करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय यंत्रणांकडे निवेदन
सरोवराच्या संवर्धनासाठी सविस्तर प्रभाव अहवाल व मास्टर प्लॅन तयार करून
लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत पुढील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे —
जिल्हाधिकारी किरण पाटील
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) शैलेंद्र डेहरवाल
एएसआयचे महासंचालक यदुबीर सिंह रावत
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
पंतप्रधान नरेंद्र मोदी
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटरचे प्रमुख खालिद अल एनानी
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात बंद
प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने निषेध म्हणून आज लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *