आठ दिवसांत दुचाकी चोरीचा पर्दाफाश धाड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; रुईखेड येथील चोरटा जेरबंद

Khozmaster
1 Min Read

धाड :

धाड शहरातील राजे संभाजी चौक परिसरात असलेल्या एका घरासमोरून २१ जानेवारी रोजी चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत पर्दाफाश करण्यात धाड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत रुईखेड (मायंबा) येथील एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.

स्थानिक हनुमान गल्ली परिसरात राहणारे शेषराव नामदेव ठाकरे यांची दुचाकी क्रमांक एमएच-२८-एएच-४१०४ ही त्यांचा चुलत भाऊ नितीन जनार्दन ठाकरे वापरात ठेवत होता. २१ जानेवारी रोजी सदर दुचाकी बावस्कर यांच्या किराणा दुकानासमोर उभी करण्यात आली होती. रात्री सुमारे १०.१५ ते २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली होती.

या प्रकरणी २२ जानेवारी रोजी धाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण, युवराज मुळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली कोरडे, पोलीस अंमलदार इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मधुकर रंगनाथ रामफळे (वय २८), रा. रुईखेड मायंबा, याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली देत चोरलेली दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांत हा गुन्हा उघडकीस आला असून धाड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *