बुलढाणा प्रतिनिधी :
संगीत ही एक जादू आहे. जीवनातील ताण-तणाव दूर करून मनाला शांती देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात संगीताचा समावेश करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.
स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले उच्च प्राथमिक शाळेत स्वरविहार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित ‘स्वरभारती – देशभक्ती गीतांचा कार्यक्रम’ २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
खरात पुढे म्हणाले की, “कार्यालयीन कामकाजात ताण जाणवला की आजही मी तबलावादन करतो किंवा संगीत ऐकतो. त्यामुळे मन शांत होते. सर्व स्तरातील लोकांनी संगीत शिकावे, त्यातून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हर्षानंद खोब्रागडे होते. यावेळी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ अरविंद टाकळकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, डॉ. मिलिंद जाधव, पत्रकार राजेश डिडोळकर, डॉ. कृतिका हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर स्वरविहार संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी देशभक्तीपर गीतांची अप्रतिम प्रस्तुती सादर केली.
यामध्ये डॉ. गजेंद्र निकम, डॉ. निलेश जाधव, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, अॅड. अमोल देशपांडे, इंजि. ज्योती खरे, शिल्पा डाबेराव, लताताई गुर्जर, नीलम श्रीवास्तव, मंजुषा जाधव, गजानन घिरके, आदित्य गोफणे, इशा राठी, प्रसेनजित मोरे, आर्यन सरोदे यांनी देशभक्तीपर गीतांनी रसिकांची मने जिंकली.
साथसंगत अभय झनके, आदित्य गोफणे, प्रकाश खरे व शंतनू सरदार यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविकिरण मोरे, संचालन डॉ. मंजुश्री खोब्रागडे, तर आभार प्रदर्शन प्रसेनजित मोरे यांनी केले.
Users Today : 5