मुलीच्या शिक्षणासाठी काढलेले ५ लाख रुपये चोरीस गेले; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातून आरोपीस केली अटक

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

मुलीच्या शिक्षणासाठी बँकेतून काढून आणलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातून जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली असून ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे.
रिसोड (जि. वाशिम) येथील शेतकरी नितीन जिजेबा पहाड हे आपल्या मुलीच्या बीएएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फी भरण्याच्या उद्देशाने दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात आले होते. त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख रुपये काढून ते आपल्या कारच्या डिक्कीत ठेवले होते. कार महाविद्यालयाच्या परिसरात उभी करून ते आत गेले असता, अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली होती.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.
पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला असता, ही चोरी आंतरराज्यीय ‘बॅग लिफ्टिंग’ टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर,
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये व पथकाने कर्नाटकात जाऊन सलग पाच दिवस शोधमोहीम राबवली.
या कारवाईत सुनील उर्फ बालु रामु बोवी (वय ३२, रा. भद्रावती, जि. शिवमोगा) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने आपल्या भाऊ विष्णू रामु बोवी याच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये जप्त केले आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *