बुलढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा बसस्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका संशयास्पद घटनेचा उलगडा करत शहर पोलिसांनी झारखंड येथून आलेल्या एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. सदर तरुणी स्वतःला परिचारिका (नर्स) असल्याचे सांगत होती; मात्र चौकशीत ती माहिती संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास बसस्थानक परिसरात एका तरुणीचा संशयास्पद वावर आढळून आला. प्रवाशांची गर्दी, थंडीचे वातावरण आणि मद्यप्राशन केल्याची स्थिती लक्षात येताच बसस्थानकावर तैनात असलेल्या महिला सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवत तरुणीला ताब्यात घेतले व पोलीस चौकीत आणले.
चौकशीदरम्यान सदर तरुणी कधी स्वतःला पुण्याची, तर कधी बुलढाण्याची रहिवासी असल्याचे सांगत होती. तिच्या बॅगेची तपासणी केली असता काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. तसेच तिच्या मोबाईलमध्ये शहरातील काही व्यक्तींचे संपर्क क्रमांक आढळून आले. पोलिसांनी त्या क्रमांकांवर संपर्क साधला असता अनेकांनी ओळख नाकारली.
यानंतर पोलिसांनी झारखंडमधील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता ती झारखंड येथील असल्याची माहिती मिळाली. पुढील चौकशीअंती सदर तरुणी वैद्यकीय सेवेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले.
संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तरुणीला संरक्षणात्मक दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ येथे दाखल केले आहे. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत.
Users Today : 5