दाताळा प्रतिनिधी :
विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर वसलेल्या बुलढाणा व जळगाव जिल्ह्यांना जोडणारी मलकापूर–चिंचखेड एसटी बस सेवा अखेर २७ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलकापूर आगारातून सकाळी ९.३५ वाजता ही बस चिंचखेडकडे रवाना झाली. यावेळी आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांच्या उपस्थितीत वाहतूक अधीक्षक सावकाश, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चव्हाण, जी. एस. पाटील, प्रमोद आहेर, जयसिंग राठोड, खोडके, कडू हिवाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बस माळेगाव येथे पोहोचल्यानंतर सरपंच निनाजी बडे, उपसरपंच नाना इंगळे, कमलबाई हिवाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी चालक एम. व्ही. गिरी व वाहक पी. डी. रत्नपारखी यांचा शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
वडजी येथे सरपंच ममता पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून बसचे स्वागत केले. तर चिंचखेड प्रगणे येथे सरपंच नंदूसिंग राजपूत, उपसरपंच प्रवीण बराटे, पोलीस पाटील किशोर सुपे, ग्रामस्थ शंकर नेमाडे तसेच चिंचखेड खुर्दचे माजी सरपंच व यशवंत विद्यालय वडजी शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्रसिंह राजपूत यांनी पुष्पवृष्टी करून बसचे स्वागत केले.
या बससेवेमुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Users Today : 5