सावळदबारा–देवळगाव गुजरी मुख्य रस्ता खराब अवस्थेत; यात्रेत भाविकांची अडचण

Khozmaster
2 Min Read

सावळदबारा प्रतिनिधी :

तालुक्यातील सावळदबारा परिसरातील देवळगाव गुजरी ते सावळदबारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून नागरिक व वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याचे काम मंजूर असूनही प्रशासनाकडून दिर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी म्हटले आहे.
अखेर नांदा तांडा ते घाणेगाव तांडा रस्त्याच्या कामाचा मुहूर्त ऐन भगवान श्रीचक्रधर स्वामी महाराजांच्या यात्रेच्या काळात काढण्यात आला आहे. दि. ३० पासून सुरू होणाऱ्या या यात्रेत राज्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक सावळदबारा व श्रीक्षेत्र येथे येणार आहेत. मात्र रस्त्याच्या कामामुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिकांचे आरोप आहेत की रस्त्यावर योग्य पद्धतीने दबाई न करता फक्त खडी टाकून ठेवण्यात आली असून संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, एस.टी. बस तसेच भाविकांची वाहतूक या रस्त्यावरून होते. मोकळ्या खडीमुळे वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तथापि ठेकेदार व प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
एकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीत नेते व्यस्त असताना, दुसरीकडे प्रशासनाने सांगितलेल्या गंभीर प्रशासकीय समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या काळात दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य, परंतु प्रत्यक्षात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक व भाविकांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *