मुंबई प्रतिनिधी :
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून, यामुळे शिक्षक वर्गासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला होणारी देशव्यापी C-TET परीक्षा आणि याच काळात येणारी निवडणूक ड्यूटी एकाच वेळी आल्याने शिक्षकांमध्ये मोठी संभ्रमावस्था पसरली आहे.
करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली परीक्षा द्यायची की शासकीय आदेशानुसार निवडणूक ड्यूटी पार पाडायची, अशा परिस्थितीमुळे शिक्षक वर्गात तणाव निर्माण झाला आहे. बहुतांश शिक्षक C-TET परीक्षेला बसलेले आहेत, त्यामुळे ड्यूटीसाठी उपस्थित राहणे शक्य होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याव्यतिरिक्त, 3 फेब्रुवारीला केंद्रप्रमुख परीक्षा असून, 7 आणि 8 फेब्रुवारीला C-TET परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांचे केंद्र जिल्ह्याबाहेर असणार आहेत आणि परीक्षा सकाळी 8 वाजताची आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यामुळे आता मतदान 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणीची प्रक्रिया 7 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण होईल. या अनपेक्षित बदलामुळे शिक्षकांसाठी नियोजनात आणि निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ झाली आहे.
Users Today : 3