दुसरबीड प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा परिस्थिती आणि संघर्षाचे कारण पुढे करून अभ्यासातील सातत्य व मेहनतीपासून दूर जातात. मात्र, ठाम ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केले, तर यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक आणि माजी विद्यार्थीनी शितल गायकवाड यांनी केले.
जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दुसरबीड येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महिला मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शितल गायकवाड यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले: “मी सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करा, मेहनत घ्या आणि ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे.” शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच मी आज या पदावर पोहोचले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर, राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेती आरती खंडागळे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, शाळा समिती अध्यक्ष किसनराव देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब मोहिते आणि संगीता मोहिते, प्राचार्य गणेश भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय बॉक्सिंग विजेती आरती खंडागळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यांनीही विद्यार्थ्यांना खेळातील संधी, शिस्त आणि मेहनत याबाबत मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका आणि विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश भांगे, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राजेजाधव आणि प्रा. दिलीप काकडे, तर स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन जि.ओ. देशमुख, प्रा. तरवडे, ज्ञानेश्वर राजेजाधव आणि प्रा. दिलीप काकडे यांनी केले.
रवींद्र धन्नावत, पर्यवेक्षक डी.एल. वायाळ, महिला शिक्षक प्रतिनिधी थेटे मॅडम, गुजर मॅडम, देशमुख मॅडम, हुसे मॅडम, खंडारे मॅडम, आटोळे मॅडम, वर्षा देशमुख आदींची उपस्थिती होती.
Users Today : 3