चिखली : बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने दि. २० नोव्हेंबर, २०२२ रोजी चिखली, जिल्हा बुलढाणा येथील सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रथम आकर्षण ठरलेल्या व नागपूर – पुणे महामार्गावरील विशेष प्रेक्षणीय अशा महाराजा अग्रसेन रिसाॅर्टच्या भव्य – दिव्य मंचावर संपन्न होणाऱ्या – बहुजन साहित्य संमेलन – २०२२ – च्या स्वागताध्यक्ष पदासाठी सुप्रसिद्ध सिध्दहस्त शल्यचिकित्सक धन्वंतरी तथा उर्दूचे जाने माने शायर व ज्येष्ठ कवी म्हणून ख्यातनाम असलेले बुलढाणा येथील डॉ. गणेश गायकवाड यांच्या नांवाची अधिकृत घोषणा आज दि. ०२ ऑक्टोबर, २०२२ रोजी बहुजन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आली. विदर्भातील तडका-कार म्हणून सर्वश्रुत असलेल्या, मेहकर निवासी ज्येष्ठ कवी प्रा. अशोक सारडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट, चिखली येथील बैठकीमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे यांनी डॉ. गायकवाड यांचे नांव संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सर्व संमतीने रीतसर जाहीर करून त्या नांवाची सार्थता सिद्ध करण्यासाठी, व-हाडातील मेहकर येथून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाची सुरुवात करून असह्य कष्ट आणि परिश्रमाने व दुर्दम्य महत्वाकांक्षेने आजच्या नामवंत शल्यविशारदापर्यंत पोचलेल्या आणि अहर्निश मनोभावे गोरगरीब रूग्णांची सेवा करतांनाच आपल्यातील चैतन्यशील कलावंताला सुध्दा साहित्यविश्वात आणि विशेषतः उर्दूच्या शेरोशायरी व मुशायऱ्यामधून मिळालेल्या प्रेरणेतून उर्दू गझल व शायरीच्या प्रांतात – आगाज, मंजर बदल न जाये, कभी सोचा न था, धूप का मुसाफिर, नये सफरका आगाज, आजादी रिटायर हो रही है – सारख्या प्रभावशाली व जनमनाची पकड घेणाऱ्या ग्रंथ संपदेच्या रूपाने साहित्य जगतात आपल्या अढळ शिल्प निर्मितीतील त्यांच्या समर्थ प्रयत्न – पराकाष्ठेची महतीही सोबतंच विषद केली व त्यामुळेच संमेलनाच्या त्या पदालाही न्याय मिळाला असे विधान केले. सदर बैठक साहित्यिक तथा कला क्षेत्रातील ज्येष्ठ कथाकार बबन महामुने, कविवर्य किसन पिसे, शाहीर मनोहर पवार, प्रा. डी. व्ही. खरात, सुधाकरराव जाधव, सुरेश अवसरमोल, गजानन जाधव, निवृत्ती जाधव ई. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.