नागपूर प्रतिनिधी –
दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘दवाखाना आपल्या दारी’ या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांत हजारो नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला असून हा उपक्रम ग्रामीण भागासाठी वरदान ठरत आहे.
राज्यातील कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये आणि प्रत्येकाला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, हे धोरण देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा नागपूर हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात ११ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. नागपूर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेल्या ग्रामीण भागात २६ मोबाइल वैद्यकीय वाहनांद्वारे मोफत प्राथमिक उपचार, तपासणी आणि औषधांचे वितरण केले जात आहे.
११ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च या कालावधीत तब्बल ४ लाख २९ हजार ९८३ रुग्णांची तपासणी या उपक्रमातून करण्यात आली. त्यापैकी २६८५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच तपासणीत १८५ क्षयरोग आणि १२० कुष्ठरोग रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान ११२ रुग्णांना मुख कर्करोग असल्याचे आढळले असून त्यापैकी ५९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय २४ स्तन कर्करोग रुग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली.
दुर्गम भागात दवाखानाच नागरिकांच्या दारात पोहोचत असल्याने रुग्णांना दूरच्या रुग्णालयात जाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे या उपक्रमाचा मोठा फायदा ग्रामीण नागरिकांना होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी दिली.
Users Today : 1